– प्रखर हिंदुत्ववादी नेते आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन
– “प्रभू श्रीरामचंद्र की जय” घोषणेने अवघे वातावरण भगवेमय
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोशी येथे काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला हजारो हिंदू बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषा आणि जयघोषांच्या निनादाने अवघे वातावरण भक्तिमय झाले होते. महिलांचे झांज पथक, ढोल ताशा पथक आणि मर्दानी खेळ हे शोभायात्रेतील विशेष आकर्षण ठरले. गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी पुरुष, महिला आणि लहानग्यांनी एकत्र येत हिंदू संस्कृतीचे वैभव पुन्हा एकदा अधोरेखित केले.
शोभायात्रेचे भव्य आयोजन
प्रखर हिंदुत्ववादी नेते आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेली ही शोभायात्रा रविवारी (दि. ३०) मोशीतील वूड्स विले सोसायटी येथून सकाळी ७ वाजता प्रारंभ झाली. शिवरस्ता ते स्वराज रेसिडेन्सी चौक असा या शोभायात्रेचा मार्ग होता. भगवे ध्वज, पारंपरिक पोशाख आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय!”, “जय श्रीराम!” अशा उत्स्फूर्त घोषणा देत हिंदू बांधवांनी या शोभायात्रेत भाग घेतला.
हे हि वाचावे
महिला आणि युवकांचा मोठा सहभाग
शोभायात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. झांज पथक, ढोल ताशा पथक आणि महिलांचा मर्दानी खेळ हे या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. यासोबतच लहानग्यांनी प्रभु श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता यांच्या वेशभूषेत सहभागी होऊन शोभायात्रेला अधिकच शोभा आणली.
सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा संकल्प
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. या पार्श्वभूमीवर नवीन पिढीला आपल्या संस्कृतीचे महत्त्व कळावे आणि हिंदू संस्कृतीचा वारसा जतन व्हावा यासाठी दरवर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जाते. यंदाच्या शोभायात्रेत युवकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. यामुळे आगामी काळातही हा उत्साह कायम राहील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
बॉलीवूड सेलिब्रिटींनी दिलेल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
"भारतीय सणांना आधुनिकतेचा स्पर्श मिळत असला तरी त्यामागील परंपरा आणि संस्कृतीचा वारसा आपण जपला पाहिजे. यासाठी गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या शोभायात्रेत महिलांचा आणि युवकांचा वाढता प्रतिसाद दिसून आला, ही आनंदाची बाब आहे." महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.