Home पिंपरी चिंचवड मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या गुन्हेगारीवर अखिल भारतीय छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा

मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी आणि वाढत्या गुन्हेगारीवर अखिल भारतीय छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा

by gauravsalunkhe00@gmail.com
0 comments

पिंपरी (दि. 19 ऑगस्ट) – राज्यातील संवेदनशील मुद्द्यांवर अखिल भारतीय छावा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ले आणि पुणे-पिंपरी चिंचवडमधील वाढती गुन्हेगारी याविरोधात संघटनेने राज्य सरकारला इशारा दिला आहे.

काळेवाडी येथील इंदू लॉन्स येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी ठामपणे सांगितले की, “मराठा समाजाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षण लागू करून दहा हजार कोटी रुपयांचे आर्थिक विकास महामंडळ सुरू करावे. मराठा समाज शांत आहे, परंतु संयमाचा कडेलोट झाल्यास परिस्थिती चिघळेल,” असा इशारा त्यांनी दिला.

शेतकरी कर्जमाफीवर ठाम मागणी

हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाकडे लक्ष वेधताना जावळे पाटील म्हणाले,
“शेतकऱ्यांचे आयुष्य दरवर्षी कर्जाच्या विळख्यात अडकते. सरकारने सरसकट कर्जमाफी जाहीर केली नाही, तर शेतकऱ्यांची आत्महत्या थांबणार नाही. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

गुन्हेगारी व मसाज पार्लरवरील टीका

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीबाबत बोलताना जावळे पाटील यांनी प्रशासनावर थेट टीका केली.
“संतांच्या पुण्यभूमीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असणे लज्जास्पद आहे. प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून अशा गैरप्रकारांना आळा घालावा,” असे ते म्हणाले.

सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचा निषेध

सामाजिक कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा छावा संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला. “जनतेसाठी काम करणाऱ्यांवर हल्ले होणे ही लोकशाहीची थट्टा आहे. राज्य सरकारने अशा प्रकरणांत गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी,” असे जावळे पाटील म्हणाले.

30 वर्षांची लढाऊ परंपरा

अखिल भारतीय छावा संघटना गेली तीन दशके शेतकरी, सामान्य माणूस व मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा देत आहे. याआधीही संघटनेने विविध आंदोलनांद्वारे शासनाचे लक्ष वेधले. जावळे पाटील यांनी यावेळी समाजातील सर्व घटकांना एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन केले.
“आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढत राहू,” असे ठणकावून सांगत त्यांनी सरकारला इशारा दिला.

Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business

You may also like

Leave a Comment