मुंबई, १८ सप्टेंबर : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच ज्येष्ठ नागरिकांसह एका ज्येष्ठ नागरिक संघाची आणि एका संस्थेची निवड यावर्षी करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ४ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात होणार आहे.
‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान – वैयक्तिक’ या पुरस्कारासाठी महिला विभागातून नवी मुंबई (रायगड) येथील वृषाली मगदुम आणि नांदेड येथील भागीरथी बच्चेवार यांची निवड करण्यात आली आहे. पुरुष विभागातून लातूर येथील प्रकाश घादगिने आणि ठाणे येथील बबन पाटणकर यांना सन्मान जाहीर झाला आहे. तर दिव्यांग प्रवर्गातून पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाची सन्मानार्थी संघ म्हणून निवड झाली असून पुणे येथील जनसेवा फाउंडेशनची सन्मानार्थी संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे.
माजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, खासदार सुप्रिया सुळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि निवृत्तीनंतरही नि:स्वार्थ भावनेने समाजसेवा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, संघ व संस्थांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या पुरस्कारांची घोषणा होताच विविध स्तरांतून सन्मानार्थींचे अभिनंदन करण्यात येत आहे.

