निगडी : रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त फत्तेचंद जैन विद्यालयाच्या वतीने निगडी वाहतूक विभागात विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाहतूक विभागातील अधिकारी, अंमलदार व वार्डन यांना राखी बांधून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक रक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी राखी बांधून वाहतूक कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी तसेच निगडी वाहतूक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रक्षाबंधनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांमध्ये स्नेह, विश्वास आणि परस्पर आदराची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत सामाजिक जाणीव आणि कर्तव्यभावना विकसित करणारा हा आदर्श उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले.

