पिंपरी : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह समाजजीवनाची मोठी हानी झाली असून, हा आमच्या कुटुंबावर आणि व्यक्तिशः माझ्यावर मोठा आघात असल्याची भावना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणेचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी व्यक्त केली.
डॉ. पी. डी. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, शिक्षण हेच जीवनकर्तव्य मानून पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी आयुष्यभर कार्य केले. कै. वसंतदादा पाटील यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विनाअनुदानित शिक्षण संस्थांना प्रोत्साहन दिले होते. त्या हाकेला प्रतिसाद देणाऱ्या प्रमुख शिलेदारांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील यांचा समावेश होता.
शिक्षणाच्या विविध शाखांमध्ये दर्जेदार सुविधा निर्माण करून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली केली. आज भारतासह जगभरातील हजारो विद्यार्थी त्यांच्या संस्थांमधून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवत आहेत.
शिक्षणतज्ज्ञ म्हणून समाजाला दिशा देण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी सक्रिय राजकारणापासून दूर राहणे पसंत केले. शिक्षण हाच त्यांचा ध्यास आणि जीवनाचा केंद्रबिंदू होता.
ज्ञानाचा उपयोग समाजपरिवर्तनासाठी व्हावा, ही त्यांची भूमिका आणि प्रेरणा भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरेल. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि अखंड कार्य भविष्यात दंतकथा म्हणून स्मरणात राहील, अशा शब्दांत डॉ. पी. डी. पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

