पुण्यातील म्हस्के वाडा ते भिडे वाड्यापर्यंत भव्य शोभायात्रा आणि पिंपरीत प्रवचन
पिंपरी, पुणे (दि.३ सप्टेंबर २०२६) युग प्रवर्तक, आर्य समाज संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांनी सन १८७५ साली पुण्यामध्ये विविध ठिकाणी निवडक व्याख्याने दिली होती, या घटनेला १५१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या प्रित्यर्थ या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुण्यामध्ये भव्य शोभायात्रा आणि पिंपरी येथे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी, (दि. ६ सप्टेंबर) सकाळी ७ वाजता पुणे कॅम्प मधील म्हस्के वाडा, एमजी रोड, राम मंदिर जवळ येथून या भव्य शोभा यात्रेची सुरुवात होऊन सकाळी ९ वाजता, तांबडी जोगेश्वरी मंदिर, आप्पा बळवंत चौक येथील बाळकृष्ण भिडे वाडा येथे समारोप होईल. यानंतर पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन येथे १० वाजता, “महर्षी दयानंद पुणे प्रवास व प्रवचने, १५१ वा स्मृती संमारंभ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती पिंपरी आर्य समाज संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस दिली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद पिंपरी आर्य समाजचे प्रधान सुरेंद्र करमचंदानी हे भूषविणार आहेत. तसेच सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा दिल्लीचे महामंत्री ॲड. प्रकाश आर्य, आर्य प्रतिनिधी सभा दिल्ली महामंत्री विनय आर्य, चित्तोडगढ राजस्थान येथील वैदिक विद्वान आचार्य कर्मवीर मेधार्थी, मथुरा उत्तर प्रदेश येथील आर्योपदेशक उदयवीर आर्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच आर्य प्रतिनिधी सभा मुंबईचे प्रधान हरीश आर्य, विजय गौतम मंत्री, विदर्भ आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान सत्यवीर शास्त्री, विदर्भ आर्य प्रतिनिधी सभेचे प्रधान स्वामी विद्यानंद सरस्वती आदींची विशेष उपस्थिती आहे.
पिंपरी कॅम्प आर्य समाज भवन येथे सकाळी १०:३० वाजता, प्रवचनास प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी, रविवारी सकाळी ७ वाजता, पुणे कॅम्प, एमजी रोड, राम मंदिर शेजारील म्हस्के वाडा येथून आप्पा बळवंत चौक तांबडी जोगेश्वरी मंदिर शेजारील भिडे वाडा पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, पुणे शहर, पिंपरी, नाना पेठ, वारजे, खडकी, आळंदी आर्य समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महर्षी दयानंद सरस्वती यांच्या पुणे प्रवासाची पार्श्वभूमी
वेदोद्धारक, युगप्रवर्तक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या “पुणे आगमन, वास्तव्य व ऐतिहासिक पुणे प्रवचने” यांस यावर्षी १५१ वर्षे पूर्ण होत आहेत. महर्षी दयानंद मुंबई येथे दि.१० एप्रिल १८७५ रोजी आर्य समाजाची स्थापना केल्यानंतर तत्कालीन समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या निमंत्रणावरून ते दि.२० जून १८७५ रोजी पुण्यात आले. या कालावधीत महर्षी दयानंद यांची पुणे शहरातील भिडे वाडा येथे १५ ऐतिहासिक व्याख्याने झाली. त्यांचे मराठी भाषेत लेखन गणेश जनार्दन आगाशे व महादेव मोरेश्वर कुंटे यांनी करून ते प्रकाशित केले आहे. तसेच प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. गंगारामभाऊ म्हस्के यांच्या प्रयत्नातून पुणे कॅम्प भागात आणखी ३५ व्याख्याने झाली. एक व्याख्यान थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या घराजवळील मोमीनपुरा परिसरात व एक व्याख्यान कृष्णराव पांडुरंग भालेकर यांच्या विनंतीवरून भांबुर्डा गावठाणातील रोकडोबा मंदिर धर्मशाळेत आयोजित करण्यात आले होते. पुण्यात दि.२० जून ते दि. ५ सप्टेंबर १८७५ या अडीच महिन्याच्या वास्तव्यादरम्यान महर्षी दयानंद यांनी समाज सुधारक, उद्योगपती नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्या वाड्यात मुक्काम केला होता. तसेच दि.५ सप्टेंबर १८७५ रोजी पुणे कॅम्प परिसरात “म्हस्के वाडा ते बुधवार पेठ, पुणे येथील ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर शेजारील श्री बाळकृष्ण भिडे यांच्या वाड्यापर्यंत हत्तीवरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यात एका पालखीत चार वेद ग्रंथ ठेवण्यात आले होते. या मिरवणुकीचे नेतृत्व थोर समाजसुधारक व सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा जोतीराव फुले, प्रार्थना समाजाचे प्रमुख न्यायमूर्ती म. गो. रानडे, समाज सुधारक प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. गंगारामभाऊ म्हस्के यांनी केले होते. ही घटना आर्य समाज महर्षी दयानंदांचे चरित्र व पुणे शहरासाठी अतिशय ऐतिहासिक ठरली आहे.
या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून पुणे शहर आणि पिंपरी येथे दि.६ सप्टेंबर रोजी “महर्षी दयानंद : पुणे प्रवास, वास्तव्य व पुणे प्रवचन – १५१ वा स्मृती समारंभ व भव्य शोभायात्रा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमात सर्व आर्य कार्यकर्ते, माता, भगिनी, युवक व समस्त पुणेकर नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आर्य समाज संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनात सुरेंद्र करमचंदानी (प्रधान), हरेश तिलोकचंदानी (मंत्री), जयराम धरमदासानी (कोषाध्यक्ष) व आर्य समाज पिंपरी, सुदर्शन मनचंदा (प्रधान), सुधीर सोनी (मंत्री), हर्ष आर्य (कोषाध्यक्ष) व आर्य समाज, नाना पेठ पुणे, किशोर पटेल (प्रधान), भगतसिंह वेलानी (मंत्री), संदीप भगत (कोषाध्यक्ष) आर्य समाज वारजे माळवाडी, पुणे, मायादेवी अग्रवाल (प्रधाना), महेश दादा (मंत्री), ब्रह्मी अग्रवाल (कोषाध्यक्षा) आर्य समाज खडकी पुणे, अतुल आचार्य (प्रधान), हेमदेवजी थापर (मंत्री) आर्य समाज आळंदी, पुणे, दयानंद शिंदे (प्रधान) आर्य समाज, चिंचवड पुणे आणि स्वामी विद्यानंद सरस्वती, लखमसी वेलानी (कार्यकारी प्रधान) प्रा. अर्जुन सोमवंशी (मंत्री), रंगनाथ तिवार (कोषाध्यक्ष) महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा यांनी आयोजनात सहभाग घेतला आहे.
शोभायात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे- म्हस्के वाडा (पुणे कॅम्प येथील गंगाराम भाऊ म्हस्के यांचे घर, २७५, एम.जी. रोड, राम मंदिर येथून शोभा यात्रेस सुरुवात होईल आणि एमजी रोड – बाटा चौक – शरबत वाला चौक – क्वार्टर गेट – नाना पेठ – डुल्या मारुती चौक – गणेश पेठ – सोन्या मारुती चौक – सिटी पोस्ट चौक – गणपती चौक – आप्पा बळवंत चौक – तांबडी जोगेश्वरी मंदिर शेजारील भिडे वाडा येथे शोभा यात्रेचा समारोप होईल.
तत्पूर्वी सकाळी सात वाजता, पुणे कॅम्प येथील मस्के वाडा येथे स्मृति यज्ञ होणार आहे. त्यानंतर ७:२० वाजता शोभा यात्रेस सुरुवात होईल. शोभायात्रेच्या समारोपानंतर पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन येथे प्रस्थान आणि १० वाजता जलपान होईल.
सकाळी १०.३० वाजता, “महर्षी दयानंद पुणे प्रवास व प्रवचने , १५१ वा स्मृती समारंभ” मुख्य कार्यक्रम आणि प्रवचनास सुरुवात करण्यात येईल आणि दुपारी १२.३० वाजता स्नेह भोजन करून कार्यक्रमाचा समारोप होईल.

