चिखली, प्रतिनिधी : कृष्णानगर व परिसरातील पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत आणि विकासकामांना गती मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी पुणे येथे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांची भेट घेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी कृष्णानगर परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा, वाहतूक, रस्ते, ड्रेनेज आणि स्वच्छतेच्या समस्या पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. तसेच अनेक विकासकामे प्रलंबित असल्याने नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींबाबत माहिती देत ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
स्पाईन रोडवरील वाईन्स शॉपीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न
बैठकीदरम्यान स्पाईन रोड परिसरातील एका वाईन्स शॉपीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दाही मारुती जाधव यांनी उपस्थित केला. वाईन्स शॉपी परिसरात होणारी गर्दी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे महिला व नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल आणि आवश्यक त्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी दिल्याचे जाधव यांनी सांगितले.
अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक भेट
यावेळी जगविख्यात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुस्तक भेट देऊन सुनेत्राताई पवार यांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक परिवर्तन, समता आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने केलेल्या प्रभावाची आठवणही यावेळी करून देण्यात आली.
नागरिकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे तसेच प्रलंबित कामे लवकर मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे मारुती जाधव यांनी सांगितले.
“नागरिकांच्या समस्या केवळ आश्वासनांपुरत्या मर्यादित न राहता त्या प्रत्यक्षात सुटाव्यात, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. विकासकामांसोबतच परिसरातील महिलांची सुरक्षितता हा देखील महत्त्वाचा विषय असून, त्यासाठीही सातत्याने आवाज उठवला जाईल,” असे मारुती जाधव यांनी स्पष्ट केले.

