पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामास नुकतीच महानगरपालिका स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘भोसरी व्हिजन 2020’ अंतर्गत साकार होत असलेला हा प्रकल्प, पिंपरी-चिंचवड संविधान भवन म्हणून ओळखला जाणार आहे.

राज्यघटनेचा अभ्यास आणि लोकशाही मूल्यांची जनजागृती हा मुख्य उद्देश ठेवून उभारले जात असलेले संविधान भवन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील महत्त्वाचे शैक्षणिक-सामाजिक केंद्र ठरण्याची शक्यता आहे. भारतीय संविधानाचा प्रचार आणि जागृतीसाठी हे भवन अत्यंत उपयुक्त ठरेल.
120 कोटी रुपयांच्या कामास मंजुरी
या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सुमारे १२० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व कामांना मान्यता देण्यात आली आहे. पेठ क्र. ११ मधील २५,८९४ चौ. मीटर क्षेत्रफळावर हा प्रकल्प उभारला जात आहे. यामध्ये अत्याधुनिक एझिबिशन हॉल (४), ३०० आसन क्षमतेचा ऑडिओरिअम, तसेच ३५० चारचाकी व १,००० दुचाकींसाठी वाहनतळ यांचा समावेश आहे.
या प्रकल्पासाठी प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारकडून ५० कोटी आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून १५ कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळ
आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी
संविधान भवनच्या पहिल्या मजल्यावर लायब्ररी हॉल्स (४) असणार असून, ही लायब्ररी आंतरराष्ट्रीय दर्जाची असेल. येथे भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोकशाही राष्ट्रांच्या घटना व राज्यघटना अभ्यासता येतील. विद्यार्थ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांसाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरेल.
आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया
> "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने आम्ही संविधान भवनाचा संकल्प केला. आता दुसऱ्या टप्प्याचे काम मंजूर झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड

