पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचत असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार थेट प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. रविवारी सायंकाळी ठीक ७ वाजता प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत प्रचाराचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते होणार असून, त्यामुळे संपूर्ण शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
या प्रचार कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लक्षात घेता, हा कार्यक्रम पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
प्रभाग १ मध्ये राष्ट्रवादीची ताकद, यश साने आघाडीवर
प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वर्गीय दत्ताकाका साने यांचे सुपुत्र यश साने हे थेट निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या सोबत विकास साने, संगीता ताम्हाणे आणि साधना काशीद हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. अनुभवी नेतृत्व, स्थानिक प्रश्नांची जाण आणि जनतेशी असलेला थेट संवाद ही या उमेदवारांची प्रमुख ताकद मानली जात आहे.
मागील आठवड्यापासूनच या सर्व उमेदवारांनी घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवत प्रचाराला वेग दिला आहे. स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत, प्रभागातील समस्या, अपेक्षा आणि विकासाची दिशा यावर सविस्तर चर्चा केली जात आहे.
‘विश्वास जुना, राष्ट्रवादी पुन्हा’ हा संदेश केंद्रस्थानी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात झालेली विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि मूलभूत नागरी सोयी-सुविधांचा दाखला देत, पक्षाकडून “विश्वास जुना, राष्ट्रवादी पुन्हा” हा संदेश प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवला जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसवर असलेला जुना विश्वास आणि अनुभवी नेतृत्वाचा वारसा हेच या निवडणुकीत पक्षाचे प्रमुख भांडवल ठरत आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अधिक रंगतदार होत असल्याचे चित्र आहे.
अजित पवारांच्या उपस्थितीने राजकीय हालचालींना वेग
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमुळे केवळ प्रभाग क्रमांक १च नव्हे, तर प्रभाग क्रमांक १२, ११ आणि २ मधील राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, विरोधी पक्षांच्या हालचालींनाही वेग आला आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, अजित पवारांचा थेट प्रचार हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होणार, हे निश्चित मानले जात आहे.

